news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

भोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ

Bhondala is a Traditional play of Maharashtra Bhondala is a Traditional play of Maharashtra

नवरात्रोत्सव म्हटला की, नऊ दिवस केली जाणारी आदिशक्तीची आराधना आणि फेर धरून केला जाणारा गरबा रास सर्वांनाच माहीत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात किंबहुना जगभरातल्या अनेक ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर पितरांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहून घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव सुरू होतो.

भोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ

आपल्या भारतीय संस्कृतीने वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सवांची निर्मिती करताना ऋतुमानातील बदल, निसर्गाशी बांधिलकी आणि निरोगी शरीर या तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला आहे. कृषिप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. म्हणूनच आपले बहुतेक सण-उत्सव हे कृषी संस्कृतीशी संबंधित आहेत.


धरणी ही माता आणि पाणी हा पिता म्हणून मानणारी आपली भारतीय संस्कृती. ज्याच्या कृपेने धरणी माता फळा-फुलांनी बहरते त्या पर्जन्यकाळातलं हस्त नक्षत्र हे शेवटचं नक्षत्र. आपल्या संस्कृतीत हत्ती हे मेघाचं प्रतीक. त्यामुळेच या नक्षत्राचा मान राखून हत्तीची पूजा करून भोंडला साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.

पाटावर रांगोळी काढून किंवा हत्तीची प्रतिकृती ठेवून त्याची पूजा करून गाणी म्हणत त्याभोवती फेर धरला जातो. भोंडला हा प्रामुख्याने कुमारिकांचा उत्सव आहे. भोवंड म्हणजे गोल फिरणे. भोवंडल या मूळ प्राकृत (संस्कृत- भूमंडल) शब्दावरून भोंडला हा शब्द आला असावा, असं संशोधकांचं मत आहे. महाभारतातसुद्धा या उत्सवाचा उल्लेख आढळतो.

‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा’ या गाण्यापासून सुरू होऊन रोज एक एक गाणे वाढवत दसऱ्याला दहा गाणी म्हटली जातात. सासू-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्रिया या खेळात आनंद साजरा करीत असतात. ‘भोंडला’प्रमाणेच ‘हादगा’ हादेखील खेळ नवरात्रीच्या दिवसांत अनेक ठिकाणी खेळला जातो. हादगा (किंवा हातगा) हा शब्दही हस्त नक्षत्रावरूनच आला आहे. या खेळात मात्र स्री-पुरुष दोघेही सहभागी होतात.

(हेही वाचा...श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे)


कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हादगा किंवा भोंडला साजरा होतो. त्याप्रमाणेच या कालावधीत खान्देश, वऱ्हाड, मराठवाड्यात भुलाबाईचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाद्रपदातील पौर्णिमेपासून आश्विनी पौर्णिमेपर्यंत महिनाभर हा सोहळा चालतो.


पूर्वीच्या काळी आश्विन महिना आला की अशा खेळांच्या माध्यमातून स्रिया-मुली एकत्र येत असत. त्यानिमित्ताने त्यांना दैनंदिन कामातून विरंगुळा मिळत असे. एकमेकांची ओळख वाढून आपापसात संवाद होत असे. पूर्वी स्रियांचं, मुलीचं जीवन फारच बंदिस्त होतं. यातून बाहेर पडून त्यांना मनसोक्त जीवन जगता यावं यासाठी नागपंचमी, मंगळागौर, हादगा किंवा भोंडला यांसारखे उत्सव सुरू झाले. सणाच्या निमित्ताने का होईना, मुलीबाळी एकत्र जमू लागल्या. आजच्या आधुनिक युगात, स्पर्धेच्या जमान्यात असा निवांत वेळ काढणे शक्य नसले तरी दोन घटका आनंद प्राप्तीच्या हेतूने का होईना, पारंपरिक पद्धतीचा 'भोंडला' खेळण्यास हरकत नाही !


भोंडल्याची प्रसिद्ध गाणी :

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे
करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,
पारवं घुमतंय पारावरी
मांडला ग मांडला वेशीच्या दारी,
पारवळ घुमतंय बुरजावरी
गुंजावनी डोळ्यांच्या साजीव टिक्का,
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवीन गाव तेवीन गाव,
कांडा तिळूबाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दूधोंडे
दूधोंड्यांची लागली टाळी,
आयुष्य दे रे ब्रह्माळी
माळी गेला शेता भाता,
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोंथेंबी,
थेंबाथेंबी आळव्या
लोंबीआळव्या या लोंबती अंगणा,
अंगणात होती सात कणसं,
हादग्या तुझी सोळा वर्ष
अतुला मातुला चरणी घातूला,
चरणीचे सोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एक एक गोंडा विसा विसाचा,
साडे नांगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो, वरीस वर्ष पावल्यांनो

(2)
एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबं झेलू
दोन लिंब झेलू बाई, तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई, चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई, पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पानवडा, माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी, येतां जातां कमळं तोडी
कमळ्याच्या पाठीमागं होती राणी
अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?
पाणी नव्हे यमुना जमुना,
यमुना जमुनेची बारिक वाळू,
तिथं खेळे चिलारि बाळू
चिलारि बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं
पाटावरच्या घडीवर निजवलं
नीज रे चिलारि बाळा,
मी तर जाते सोनारवाड्‍या
सोनारदादा सोनारभाई, गौरीचे मोती झाले कां नाहीं ?
गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली, मांडव घातला मखमख पुरी
लगीन लागलं सूर्योदयीं, भोजन झालं आवळीखालीं
उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं, शेणगोळा आंब्याखालीं
पानसुपारी तुळशीवरी, वरात निघाली हत्तीवरी

(3)
अक्कणमाती चिक्कणमाती,
अशी माती सुरेख बाई, ओटा जो घालावा
असा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं।
असं जातं सुरेख बाई, सपीट काढावं।
असं सपीट सुरेख बाई, करंज्या कराव्या।
अशा करंज्या सुरेख बाई, तबकीं भराव्या।
असं तबक सुरेख बाई, शेल्यानं झाकावं।
असा शेला सुरेख बाई, पालखीं ठेंवावा।
अशी पालखी सुरेख बाई, माहेरीं धाडावी।
असं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळतं।
असं सासर द्वाड बाई, कामाला जुंपतं॥

अशी गाणी गाऊन झाली की जिच्या घरी भोंडला असेल तिच्या घरी मुलींसाठी खास खाऊ बनवण्याची प्रथा होती. त्याला खिरापत असंही म्हणत. ही खिरापत पातेल्यात किंवा डब्यात झाकून मुलींच्या समोर आणली जात असे आणि आज खिरापतीत काय असेल, हे ओळखण्याचा खेळही खेळला जात असे. जिने अचूक ओळखलं तिला थोडासा अधिक खाऊ मिळत असे.

 

web title : Bhondala is a Traditional play of Maharashtra

0 Response(s) to “भोंडला - महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ”

Leave a reply