news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

ऐक जंगला, तुझी कहाणी

आटपाट नगर होतं आणि त्याच्या आसपास मोठ्ठं जंगल होतं. भरपूर दाट वाढलेली झाडं, वर्षभर हिरवंच राहणारं गवत, काही छोटी तर काही मोठी तळी, सगळं काही होतं. पण ते जंगल काही एकटं नव्हतं. त्याचं बाजूच्या जंगलाशी घनिष्ठ नातंही  होतं. कित्येक डोंगरदऱ्यांवर पसरून शेकडो वर्षं ते आनंदाने उभं होतं. आटपाट नगरातल्या माणसांना मात्र हे जंगल फारसं  आवडत नव्हतं. तिथे पल्याडही  एक विस्तीर्ण जंगल आहेच की, मग हा डोंगराळ पट्टा कशाला हवा आणखीन? डोंगराच्या पलीकडे जायला किती त्रास होतो? मग हळूच काही दिवसांनी तिथे रस्ते आले. त्यांच्यातला एक माणूस थोडा शहाणा होता, तो म्हणाला, आपल्या नगरातल्या लोकांना दुधाची गरज तर आहेच, मग त्यासाठी गायी म्हशी हव्यात, त्यांच्यासाठी चराऊ कुरण म्हणून हा भाग राखून ठेवू. रस्ते असू देत इथे. क्वचित कधी नगरीतल्या मुलांना झाडापेडांकडे यावेसे वाटले तर काही बागाही फुलवून ठेवू त्यांच्यासाठी. पण तेवढेच. त्यापलीकडे शहरी माणसांनी फार फिरकू नये इकडे. मग बराच काळ ते जंगल तसेच राहिले, जितके सोपे तितकेच अवघड, जितके रम्य तितकेच गूढ, जितके आकर्षक तितकेच अंतर्मुख.

पण जास्त दिवस झाले नसतील असे काळ बदलला आणि राजा बदलला. म्हणजे आधीचा जाऊन दुसरा आला. त्याला वाटले ठीक आहे, राखीव कुरण आहे तेवढे ठेवू, पण नगरीत आता  लोकांना जागा अपुरी पडतेय, थोडे दोन बाजूंचे म्हणजे उत्तरेचे आणि दक्षिणेचे तुकडे लोकांना राहायला देऊ. त्यांचीही सोय व्हायला हवीच. मग डोंगराच्या एका अंगाने मोठा थोरला रस्ता आला, रस्त्यामुळे दोन भाग पडले, मोठं जंगल आपसूकच छोट्या जंगलापासून दुरावलं. छोट्या जंगलातले जीव बिचकलेच, पण माणूस शेवटी आपला राजा आहे, आपली थोडी गैरसोय व्हायचीच, चालायचंच असं म्हणत त्यांनी स्वतःची समजूत काढली.

हेही वाचा- सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य

मग हळूहळू जंगलाच्या पूर्वेकडे माणसं राहायला गेली तशी त्या जंगलातून बऱ्याच माणसांची येजा सुरू झाली. राजानेच तशी ती सुरू करून दिली. पूर्वेकडच्या एका मोठ्ठ्या तलावाच्या सान्निध्यात एक चतुर माणसाने खूप मोठी वसाहत वसवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यानं चतुरपणे राजाला पटवून दिलं की इथे वस्ती झाली तर ती राजाच्याच फायद्याची ठरेल. मग पूर्वेकडच्या डोंगरावर अतिप्रचंड वसाहत उभी राहिली. जंगल दबलं. माणसांना आनंद झाला की नुसत्या झाडांपायी एवढी जमीन फुकट जात होती, काहीतरी उपयोग तरी झाला. आता आनंदात राहू. जंगलातले बेघर झालेले प्राणी क्वचित प्रसंगी माणसांची घरं बघायला येत.

 काळ पुढे गेला, राजा नवाच आला. त्याच सुमाराला राज्यातल्या एका अति श्रीमंत माणसाला डोंगर विकत घ्यायचं सुचलं. तोही भर जंगलातला. आजपर्यंत असं स्वप्न तर कोणीच पाहिलं नव्हतं. जंगलाच्या मधोमध हिरवागार डोंगर, त्यावर त्याच्याचसारख्या श्रीमंतांची आलिशान घरं, वाहवा ! तर या माणसाने गुपचुप राजाला गाठलं. आपली योजना त्याला समजावून दिली. राजा हुरळला. म्हणाला, चालेल नाहीतरी या दूधविक्या लोकांनी जमीन फुकटची अडवून ठेवली आहे. आता या डोंगरावर पंचतारांकित संस्कृती उभी करू. झालं. मधला डोंगरही उजाड व्हायला सुरुवात झाली. काही चार माणसांनी या योजनेला विरोध करण्याचं ठरवलं पण राजा शक्तिमान होता. चार चुकार शब्दांना त्याने कधीच गप्प करून टाकलं. जंगलावर प्रेम करणाऱ्या लोकांनी विकास हा शब्द तेव्हा प्रथमच ऐकला. डोंगरावर ताडमाड भयाण दिसणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या.

आणखी काही वर्षं उलटली. आटपाट नगरीत टीव्ही आणि चित्रपटांचं भलतंच वेड बोकाळलं होतं. एका चित्रपट ताऱ्याच्या कन्येला वाटलं आपला स्टुडिओ हवा तर या जंगलातच. पण तो रस्त्याला लागूनही हवा बाई. नाहीतर तारेतारका चित्रीकरणाला येणार तरी कशा? मग तीही राजाला जाऊन भेटली. राजा भलताच उदार. त्याने लगोलग या कन्यकेला तिला हवी ती जागा देऊन टाकली. आपल्या राज्यातल्या माणसांची सोय आपण नाही बघणार तर आणखी कोण? झालं. स्टुडिओचं अतिक्रमणही जंगलाने पचवून घेतलं. मग थोड्याच दिवसात जंगलातून चकचकीत गाड्यांची प्रचंड रहदारी सुरू झाली. विकास विकास म्हणतात तो यालाच अशी माणसांची खात्री झाली. सर्वत्र छान छान इमारती, सुंदर गाड्या, देखणी माणसं. आणि मधूनच झाडे, तळी हेसुद्धा होतंच की. उगाच तक्रार कशाला करायची.

हेही वाचा- सर्वोच्च पुरस्कारासाठी सर्वोत्तमाची निवड!

पण याहून पुढे आणखीही भीषण घडणार होतं. माणसांना जागा अपुरी तर पडतच होती पण आता त्यांना रस्तेही अपुरे पडायला लागले. लांबच्या ठिकाणी रोजीरोटीसाठी जाणं कठीण होत होतं. आणि याच सुमारास राजाही नवीन आला होता. नव्या दमाचा, उत्साही. पार दूरच्या गावातून आला होता तो. शहराच्या आतच जंगल त्याने पाहिलं नव्हतं कधी. त्याच्या मनात वेगळ्याच कल्पना होत्या. लोकांची सोय महत्त्वाची. काही अति वेगवान गाड्या आणू, आणि माणसांना दूरपर्यंत, त्यांच्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोचायला मदत करू असं ठरवलं होतं त्याने. मग त्याच्या जवळची माणसं म्हणाली या वेगवान गाड्या ठेवणार कुठं? आणि लागलीच काही चतुर माणसांनी ते अर्धंमुर्धं जंगल दाखवलं त्याला. राजाला जागा पसंत पडली. म्हणाला, एवीतेवी फालतू झाडांपायी फुकट जातेय इथली जमीन, किती भाव आहे माहिताय या जमिनीला. आजूबाजूच्या मंडळींनी मान डोलावली. राजा म्हणेल तेच खरं. व्हायलाच पाहिजे, गाड्यांचा तळ इथेच व्हायला पाहिजे. पण आटपाट नगरीतली काही जुनीजाणती माणसं आता विरोध करायला लागली. म्हणाली गाडीतळ इथं नको, दुसरीकडे कुठंही करा. राजा चिडला. त्यानं न्यायाधीशांना कामाला लावलं. म्हणाला, या टिवटिव करणाऱ्या मंडळींना काही करून रोखा. फुकाची अक्कल शिकवतात लेकाचे.  झाडे हवीत की गाड्या हव्यात यावरून मोठाच वाद उभा राहिला. सगळे अधिकारी राजाच्या समर्थनासाठी जीवाचं रान करायला लागले.

न्यायाधीशांनीही कागदांवर बरोब्बर बोट ठेवून एक गोष्ट ध्यानात आणून दिली. म्हणाले, हे जंगल नव्हतंच कधी. माणसाला काय, चार झाडं बघितली की जंगल वाटतंय. पण पाहा इथे किती इमारती आधीपासून उभ्या आहेत, लोक राहतात, सहलही करतात, चित्रीकरण करतात, नगरच हे. जंगलाचा आभास निर्माण करणारे नगरच हे. झालं. जाणत्या लोकांचा पराभव झाला. आणि राजाच्या गोटात जल्लोष झाला. राजा खुश. त्याचे अधिकारी त्याहून खुश. शनिवारच्या आत, रातोरात... ताबडतोब ही  झाडं नष्ट होऊ द्यात! आदेश निघाले. राजा बोले, दळ हाले. फौजफाटा जमला. धारदार करवती बाहेर निघाल्या. घाव पडले. झाडांनाही माहिती होतं, हे असे एक दिवस घडणारच होतं. तुझ्यानंतर मी असं ठरवत ठरवत, सपासप चालली करवत. घावावर घाव. उजाड गाव. शहाणीसुरती माणसं बसली अश्रू ढाळत. पण हे एक दिवस घडणारच होतं.

या माणसांनाही एक दिवस समजायलाच हवं की हा रिपीट टेलिकास्ट आहे खांडववनाचा. जेव्हा पांडवांनी जंगलाची भीषण कत्तल करून इंद्रप्रस्थ नगरी वसवली. तेव्हापासून हाच इतिहास आहे माणसाचा.

या माणसांनाही एक दिवस समजायलाच हवं की जेता म्हणतो तीच व्याख्या असते विकासाची. कुणाला हवा असो अथवा नसो. जेता म्हणेल तीच पूर्व दिशा असते. कुणाला पटो अथवा न पटो. कारण सर्वांनी त्यालाच राजा म्हणून निवडून दिलेलं असतं आणि आतापर्यंतच्या सगळ्या राजांनी हेच तर केलेलं असतं. 

Web Title- Editorial on mass cutting of trees at Aarey forest for proposed metro carshed

0 Response(s) to “ ऐक जंगला, तुझी कहाणी”

Leave a reply