news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

 

'राईस पुलर' ही गुन्हेगारीची आंतरराष्ट्रीय पद्धत मुंबईत वापरून व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांना फसवणाऱ्या टोळीचे पितळ मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडे पाडले आहे. पाच जणांच्या या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून फसवणुकीच्या साहित्यासह काही रासायनिक द्रव्यं हस्तगत करण्यात आली आहेत. नासा, इस्रो, डीआरडीओ या संस्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून या टोळीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा

इस्रोसारख्या अनेक संस्था उपग्रहांमध्ये वापरत असलेल्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा फायदा होऊ शकतो, असे सांगून व्यापाऱ्यांना फसविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रईस शेख, दत्तात्रय म्हसवेकर, सहायक निरीक्षक शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील यांच्या पथकाने मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगरातील एका बंगल्यात छापा टाकला. विकास सिंग, कलीम शेख, विप्लब हारण डे, साजिद शेख, शिवाजी तिवारी या पाच जणांना संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. या बंगल्यातून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य, वेगवेगळ्या धातूच्या वस्तू, केमिकल्सच्या बाटल्या, अँटी रेडिएशन सूट, प्रक्रिया केलेले तांदूळ, मोबाईल फोन, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्रे, शिक्के तसेच इतर साहित्य सापडले.

कशी होती कार्यपद्धती?

ही टोळी कॉपर इरिडियम या धातूची वस्तू खरेदी करणाऱ्या आणि विकणाऱ्या बोगस व्यक्तीला गुंतवणूकदारासमोर उभी करायची. कॉपर इरिडियमच्या वस्तूचे परीक्षण करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. आपण हा खर्च केल्यास कोट्यवधी रुपये मिळतील, असे सांगून गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये उकळले जात होते. नवी मुंबईतील एका व्यावसायिकाने यामध्ये सव्वा कोटी रुपये गुंतविले होते. अशा प्रकारे १२ ते १३ जणांच्या या टोळीने अनेकांना फसविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.

(हेही वाचा...रोड शो आदित्य ठाकरेंचा; चांदी चोरट्यांची)

राईस पुलर म्हणजे नक्की काय?

गेली काही वर्षे जगभरात अधूनमधून या राईस पुलिंग ट्रिकवर आधारित गुन्हे पकडले जात आहेत. राईस पुलर म्हणजे कॉपर आणि इरिडियम या मौल्यवान धातूपासून बनवलेली अतिप्राचीन भांडी असून त्याच्या आतमध्ये तांदूळ खेचून घेण्याची क्षमता आहे अशी बतावणी केली जाते. राईस म्हणजे तांदूळ. तांदूळ एका बाजूला ठेवून समोर कॉपर इरिडियम धातूची वस्तू/ भांडे ठेवली जाते. ही वस्तू अथवा भांडे समोर ठेवलेला तांदूळ किती लांब अंतरावरून खेचून घेते, यावर या वस्तूची किंमत ठरते. जितक्या जास्त लांबीवरून तांदूळ खेचला जाईल तितकी कॉपर इरिडियमच्या या वस्तूची किंमत अधिक असते. ती कोट्यवधींच्या घरात असते. यालाच राईस पुलिंग असे म्हटले जाते. ही गुन्हे पद्धत परदेशात अधिक प्रचलित आहे. भारतातदेखील ही भांडी शुभशकुनी असून मोठा धंदा खेचून आणतील असे सांगून व्यावसायिकांना गंडा घातला जातो.

Web title : rice pulling scam 5 arrested in Mumbai

 

0 Response(s) to “'राईस पुलर' फसवणुकीचा नवा फंडा, व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा ”

Leave a reply